शनिवार, २९ जानेवारी, २०११

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!----मंगेश पाडगांवकर

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! - मंगेश पाडगांवकर


माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!



केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

- मंगेश पाडगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा