मंगळवार, २९ मार्च, २०११

लाडकी बाहली होती माझी एक ---शांता ज. शेळके

लाडकी बाहली होती माझी एक


मिळणार तशी ना शोधूनी दुसरया लाख

किती  गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केस ते  सुंदर  काळे कुरळे

झाकती उघडती निळे हासरे डोळे

अन ओठ जसे की आताच खुदकन हसले

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले  लाल  फितीचे फुल

कितीतरी बाहुल्या  होत्या  माझ्याजवळी

पण तीच सोनुली फार मला आवडली

मी गेले  तीजसह माळावर खेळाया

मी लपनू  म्हणते  साई सटु टा हो या या

 किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली

परतले  घरी मी होउन   हिरमुसलेली

स्वनात तीने  मम रोज एकदा यावे

हलवून मला हळु माळावरती नयावे

वाटते सारखे तयाच ठिकाणी

शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा  ती चिमणी
जाणार कशी पण सतंत पाउस धार

खल मुळी न तिजला  वारा झोंबे  फर

पाऊस उघडता गेले  माळावरती

गवतावर ओलया मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तडुवूनी  तिजला

पाहुनी  दशा ती रडूच आले  मजला

मैत्रिणी   म्हणाल्या  काय आहे हे ध्यान

केसांच्या झिपर्या रंग हि गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहली होती माझी म्हणुनी
                                                           शांता ज. शेळके
 

मंगळवार, २२ मार्च, २०११

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर



पिपांत मेले ओल्या उंदिर;

माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;

माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,

पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं

गात्रलिंग अन धुऊन घेउन.



जगायची पण सक्ती आहे;

मरायची पण सक्ती आहे.



उदासतेला जहरी डोळे,

काचेचे पण;

मधाळ पोळें

ओठांवरती जमलें तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!
                               
                         --   बा.सी.मर्ढेकर

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी -सुरेश भट.

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी --सुरेश भट


तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..
                                   
                                       -सुरेश भट.





लाजून हासणे अन्‌ -- मंगेश पाडगांवकर

लाजून हासणे अन्‌     

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे

                              -मंगेश पाडगांवकर







एकदा केंव्हा तरी -- -मंगेश पाडगांवकर


एकदा केंव्हा तरी     -- -मंगेश पाडगांवकर

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,

आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥

                         -मंगेश पाडगांवकर

शुक्रवार, १८ मार्च, २०११

आजीचे घडाळ ------केशवकुमार

आजीचे घडाळ

आजीच्या जवळी घडाळ कसले आहे चमत्कारिक ,
दई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
तयाची टिक टिक चालते न कधीही , आहे मुके वाटते ,
किल्ली दई न तयास ती कधी, तरी ते सारखे चालते


" अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे राती बिछ्यान्यावरी
साडेपाचही वाजतात न कु ठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोबडा, उठ की !"
                                                    ---केशवकुमार

ताईची करण्यास जममत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटीवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे.


खेळाचया अगदी भरांत गढुनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तीनसांजा ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले "खेळ पुरे , घरातं परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"


आजीला बिलगून ऐकत बसु जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात की रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा


सांगे वेळ, तशाच वार- तिथीही आजी घडाळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला तयातुनी
मौजेचे असले घडाळ दडुनी कोठे तिने ठेविले ?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो ! तरी ना मिळे !

                                                       ---केशवकुमार

रे हिंदबांधवा , थांब या सथळी - भा. रा. तांबे

रे हिंदबांधवा , थांब या सथळी -  भा. रा. तांबे



रे हिंदबांधवा, थांब या सथळी अशु दोन ढाळी,

ती पराकमाची जयोत मावळे इथे झांशीवाली ll ध ु ll

तांबेकुलवीरशी ती,

नेवाळकरांची कीर्ती ,

हिंदभूधवजा जणु जळती,

मदारनी राणी लकमीबाई मूत र महाकाली ll १ ll

घोडयावर खांदा  सवार,

हातात नंगी  तलवार,

खणखणा किरत ती वार,

गोयारची कोडी फोडित , पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली ,

शत्रूंची  लषकरे थिजली ,

मग कीर्तीरूप  ती उरली,

ती हिंदभूमीच्या   , पराकमाची  इतिश्रीच    झाली ll ३ ll

मि ळतील इथे  शाहीर,

लविवतील माना वीर,

तर, झरे ढाळीतील नीर,

हा दगडां फु टतील िजभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

                                                          -भा रा तांबे

बुधवार, १६ मार्च, २०११

ती फुलराणी - बालकवी

ती फुलराणी



हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!


तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !
 
                                                                 - बालकवी


सोमवार, १४ मार्च, २०११

मग माझा जीव तुझ्या -- सुरेश भट


मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल            
                                                           - सुरेश भट

दवांत आलीस भल्या पहाटे - बा सी मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटे
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
                                    - बा सी मर्ढेकर


बुधवार, ९ मार्च, २०११

पत्र - भाऊसाहेब पाटणकर

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
- भाऊसाहेब पाटणकर

सब घोडे बारा टक्के - विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!


गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!


जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!
- विंदा करंदीकर

तक्ता - अरुण कोलटकर

तक्ता.

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय

- अरुण कोलटकर

मग माझा जीव तुझ्या - सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
- सुरेश भट

बुधवार, २ मार्च, २०११

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
---कुसुमाग्रज

मंगळवार, १ मार्च, २०११

दुबळी माझी झोळी....ग. दि. माडगूळकर

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

---ग. दि. माडगूळकर

सकाळी उठोनी ..बा. सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||

                                    -----बा. सी.मर्ढेकर