बुधवार, ९ मार्च, २०११

मग माझा जीव तुझ्या - सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
- सुरेश भट

बुधवार, २ मार्च, २०११

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
---कुसुमाग्रज

मंगळवार, १ मार्च, २०११

दुबळी माझी झोळी....ग. दि. माडगूळकर

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

---ग. दि. माडगूळकर

सकाळी उठोनी ..बा. सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||

                                    -----बा. सी.मर्ढेकर