मंगळवार, २२ मार्च, २०११

एकदा केंव्हा तरी -- -मंगेश पाडगांवकर


एकदा केंव्हा तरी     -- -मंगेश पाडगांवकर

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,

आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥

                         -मंगेश पाडगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा