मंगेश पाडगांवकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंगेश पाडगांवकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ मार्च, २०११

लाजून हासणे अन्‌ -- मंगेश पाडगांवकर

लाजून हासणे अन्‌     

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे

                              -मंगेश पाडगांवकर







एकदा केंव्हा तरी -- -मंगेश पाडगांवकर


एकदा केंव्हा तरी     -- -मंगेश पाडगांवकर

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,

आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥

                         -मंगेश पाडगांवकर

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

एकमेकांशिवाय.... मंगेश पाडगावकर.

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.

एकामेकांशिवाय
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

                                                                                               -----मंगेश पाडगावकर.

बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...मंगेश पाडगांवकर


हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

                     -मंगेश पाडगांवकर. 

शनिवार, २९ जानेवारी, २०११

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!----मंगेश पाडगांवकर

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! - मंगेश पाडगांवकर


माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!



केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

- मंगेश पाडगांवकर

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर


जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
                             -- मंगेश पाडगावकर

गुरुवार, २० जानेवारी, २०११

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..

मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?



मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं..
 
..... मंगेश पाडगांवकर